Wednesday, May 25, 2011

तरुण, तडफदार, अभ्यासू, सय्यमी युवानेते मा. आमदार धैर्यशील पाटील

              "धैर्यशील पाटील" हे नाव ऐकताच आठवतो तो "सेझ" विरुद्धचा शेतकऱ्यांचा सातत्यपूर्ण लढा. सेझ विरुद्ध लढण्यासाठी  पेण खारेपाटातील शेतकऱ्यांना गरज होती सक्षम नेतृत्त्वाची आणि ह्याचवेळी एक नवीन नेतृत्त्व निर्माण झालं ते म्हणजे शेकापचे युवानेते धैर्यशील पाटील. कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता डॉ. एन डी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील दादा आंदोलनात उतरले एक मोठी चळवळ दादांनी उभी केली आणि सेझला हद्दपार केले. त्यानंतर काही काळातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि ज्येष्ठ नेते भाई मोहन पाटलांनी युवा नेतृत्त्वाकडे जबाबदारी सोपवण्याचे जाहीर केले आणि शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. धैर्यशील पाटलांसमोर आव्हान होते कॉंग्रेसचे कॅबिनेट मंत्री रवी पाटील आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे ह्यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरेंचे एवढ्यामोठ्या धनशक्ती समोर उभ्या असताना दादा गडबडले नाही आणि शेवटी निकालाचा दिवस आला "जनशक्ती विरुद्ध  धनशक्ती" ह्या लढतीत जनशक्तीचा विजय झाला. कॉंग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्याचा पराभव करून शेकापचे युवानेते धैर्याशिलदादा पाटील बहुमतांनी विजयी झाले.
                      विधानसभेत पोहोचलं तरुण, तडफदार, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आमदार धैर्यशील पाटील, पहिल्याच अधिवेशनात आपल्या कर्तृत्त्वाची झलक त्यांनी संपूर्ण सभागृहाला दाखवली, प्रथमच निवडून आलेल्या आमदारांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या पहिल्या ३ आमदारांमध्ये दादांचे नाव आले आणि पेणकरांच्या मनात दादांबद्दल असलेला अभिमान अधिकच वाढला आपली निवड चुकली नाही ह्याचे समाधान पेणकरांना वाटू लागले.
वक्तृत्त्व हि दादांची जमेची बाजू, अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विशेष शैलीमध्ये ते भाषण करतात आणि समोरचा माणूस किंवा कार्यकर्ता सर्वकाही विसरून त्यांचं भाषण ऐकत असतो.
                  पेणमधील पेण अर्बन बँकेचा प्रश्न असो व खारबंदिस्तीचा प्रश्न असो दादांनी रस्तावर उतरून तसेच विधान सभेत अशा अनेक प्रश्नांवर लढा दिला आणि अजून देत आहेत. गणपती कारखानदारांचा प्रश्न असो पेण शहर तसेच ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न, हेटवणे धरण सिंचन प्रकल्प अशा अनेक समस्या दादांनी कोणताही पक्षभेद न मानता विधानसभेत मांडल्या आहेत. पेणकरांचा भाग्य म्हणून असा लोकप्रतिनिधी पेणला लाभला. 
                 दादांच्या भावी कामगिरीसाठी शुभेच्छा.......


-प्रभाकर प्रकाश शिंगरुत             

अभ्यासू, आक्रमक, तडफदार नेतृत्त्व मा. जयंतभाई पाटील

नाशिक येथे झालेलं शेकापच ते अधिवेशन, नेतृत्त्व बदल होणार ह्याची कल्पना कोणालाच नव्हती आणि अचानक वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला आणि पक्षाची सूत्रे तरुण उमद नेतृत्त्व पक्षाचे विधान परिषदेतील आमदार पक्षाचे नेते माननीय जयंत पाटील ह्यांचाकडे सोपवण्यात आली आणि सुरु झालं ते एक नवीन पर्व. शेकापच नेतृत्त्व एका मध्यम वयाच्या अभ्यासू परंतु तेवढेच आक्रमक असणाऱ्या नेत्याकडे सोपवण्यात आले अर्थात त्यांचा निवडीला विरोध हा झाला पण तो क्षणिक होता लवकरच जयंतभाईंचे नेतृत्त्व सर्व कार्यकर्ते तसेच नेत्यांना मान्य झाले .
त्यानंतर पक्षाच चित्रच हळूहळू बदलायला लागलं 'वृद्धांचा पक्ष' अशी काही लोकांकडून झालेली टीका मोडीत काढत पक्षाकडे येणारा तरुण वर्ग वाढत गेला.शेकापमधून बाहेर गेलेले कार्यकर्ते तसेच इतर सर्वच वर्गातील नागरिक शेकापवर विश्वास ठेऊन पक्षात येऊ लागले आणि त्याचाच प्रत्यय ७ मार्च २०११ रोजी झालेल्या मोर्चात आला, न भूतो न भविष्याती असा हा मोर्चा झाला. शेकाप संपला असा म्हणणार्यांना चोख उत्तर ह्या मोर्चातून मिळाले. भाजप तसेच इतर मोठ्या पक्षांचा मोर्चा होऊन पण सरकारनी त्यांची दाखल घेतली नाही पण शेकापच्या मोर्चाची दाखल शासनाला घ्यावी लागली आणि म्हणून सरकारतर्फे पतंगराव कदम ह्यांनी मोर्चास्थळी येऊन आंदोलकांना संबोधित केले. 
रायगड जिल्हा परिषदेचे दिवंगत अध्यक्ष स्वर्गीय प्रभाकर पाटील ह्यांचे जयंत पाटील हे ज्येष्ठ पुत्र. वयाचा १८व्या वर्षी अलिबाग पंचायत समितीवर जयंतभाई निवडून आले.आणि पुढे त्यांची हि घोडदौड अशीच चालू राहिली आणि फक्त २ आमदार विधानसभेवर असताना ३१ मते मिळून जयंतभाई विधान परिषदेवर निवडून आले . 
सहकार क्षेत्रातील जयंतभाईंची कामगिरी उल्लेखनीय आहे, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक संकटात असताना(जवळपास १९९० च्या काळात ) जयंत भाईंची बँकेच्या चेअरमनपदी निवड झाली आणि बँकेने गरुड झेप घेतली आणि आता महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अग्रणीची जिल्हा बँक म्हणून बँकेकडे बघितलं जाते नुकतंच बँकेने ५० व्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि इतर सहकारी बॅंका डळमळीत झालेल्या असताना रा. जी. बँक मात्र मजबूत स्थितीत आहे.
रायगड जिल्ह्यातील शेकापच्या यशाचे शिल्पकार असणारे जयंतभाई महाराष्ट्रात सुद्धा शेकापचे गतवैभव परत आणतील अशी अपेक्षा नाही तर खात्री आहे........

  प्रभाकर प्रकाश शिंगरूत 



  
                                                                                                        

Sunday, May 22, 2011

शेकापला ऐतिहासिक संधी

डाव्यांचा गड बंगाल मध्ये कोसळला म्हणून आनंदाच्या उकळ्या ज्यांना फुटल्या आहेत, त्यांना भारतीय राजकारणाचा खरा आशयच समजलेला नाही त्याचप्रमाणे ज्या साम्यवादाचा पराभव बंगाल आणि केरळ मध्ये झाला, त्यांना 'साम्यवाद' या विचारप्रणालीचा अर्थ अद्याप लागलेला नाही. साम्यवादाचा पराभव जगात कोणी केला असेल, तर तो भांडवलदारांनी नाही अथवा फासिस्तानीही  नाही! साम्यवादाचा पराभव साम्यावादानीच केला, कार्ल मार्क्स म्हणून तर म्हणाला होता, 'Thank God! I am not Marxist' कोणत्याही विचारसरणीची पोथी होते , तेंव्हा तो विचार कालबाह्य होण्याची भीती निर्माण होते. सामाकालीनातेशी नाते नसणारा कोणताही आदर्शवाद वास्तव्याच्या भूमीवर ठामपणे उभा राहू शकत नाही. तो कोसळतोच आणि तो कोसळला म्हणून इतरांना जे दोष देतात त्यांच्या अभ्युदयाची शक्यता शून्य असते. भारतातील डावी चळवळ प्रभावहीन झाली, बंगालातील लाल किल्ला 'हतबुद्ध' झाला आणि महाराष्ट्रातील गढी कोसळल्या, या सार्याचे कारण आहे ते हे! हे विश्लेषण करायला आज एक निमित्त आहे . पनवेल नगरपालिका शेकापने आणि महायुतीने जिंकली आहे. कॉंग्रेसचा पराभव करत शेकापच्या उमेदवाराने मुसंडी मारली आणि शेकापचे संदीप पाटील नगराध्यक्ष झाले.
हे यश राजकीय व्युहरचनेचे आहेच हे खरेच पण 'अशा' राजकारणात वाकबगार असणाऱ्या कॉंग्रेसचा पराभव करणे हे त्या अर्थानेही सोपे नव्हते. मुद्दा असा कि एकीकडे डावे पक्ष मान टाकत असताना शेकाप मात्र अधिक शहाणपणे झेपावतो आहे, याचे लॉजिक कसे मांडता येईल? पुरोगामी समजल्या जाणाऱ्या पक्षाचा जनाधार ओसरत असताना शेतकरी कामगार पक्षाची ताकद उत्तरोत्तर वाढत आहे, याचे कारण कसे सांगता येईल! याचा अर्थ आपला पक्ष आज राज्यभर सामर्थ्यवान आहे असा अजिबात नाही. मात्र, देशातील हा एकमेव डावा पक्ष आहे , जो अभ्यूदायाच्या दिशेने चालला आहे, ज्याला विस्ताराची ओढ आहे आणि जो तरुणीला आकृष्ट करू शकतो आहे! 
-विशेष संपादकीय दैनिक कृषीवल 
                  

शेतकरी कामगार पक्ष

1946 च्या सप्टेंबर महिन्याच्या काळात शंकरराव कॉंग्रेस अंतर्गत कार्य करणा-या सहका-यांना मोरे यांनी आपली खंत बोलून दाखविली. ते म्हणाले, “कॉंग्रेस पक्षाने जनतेला वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांना आणि निवडणूक जाहिरनाम्यातील बचतांना हरताळ फासलेला आहे. कॉंग्रेस सरकार हे भांडवल दारांचे हीत पाहणारे आणि शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन करण्याच्या घोषणेच्या विरोधात काम पाहत आहे. यामुळे आपणास वेगळा मार्ग निवडावा लागेल.” उपरोक्त संत व्यक्त केल्यानंतर प्रत्यक्षात 11-09-1946 रोजी शंकरराव मोरे यांनी त्यांचे सहकारी भाऊसाहेब राऊत, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, रामभाऊ नलावडे व इतर काही आमदारांच्या मदतीने ‘शेतकरी -कामकारी संघ’ स्थापन केला. सदर ‘शेतकरी-कामकारी संघ’ स्थापनेनंतर कॉंग्रेसमधील मोरे यांच्या विरोधकांनी टिकास्थ सोडले. त्यावेळेस ‘नवयुग’ सारख्या साप्ताहिकांमधून शंकरराव मोरे यांनी आपल्या लेखणीने त्यांना चोख उत्तर दिले. यानंतर दिनांक 11-01-1947 रोजी फणसवाडी येथील शंकररावजी मोरे यांच्या बंगल्यात पुनश्र्च एकदा कॉंग्रेस शेतकरी-कामकरी संघाची बैठक बोलावण्यास आली होती. सदर बैठकीत महाराष्ट्राचे उदगाते यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम “शेतकरी-कामकरी पक्ष” स्थापनेस प्रखर विरोध केला होता.या विरोधाने खचून न जाता पूण्यात भाऊसाहेब शिरोळे यांच्या घरी केशवराव जेधे, औटे, मोहीते, आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, भापकर, भाऊसाहेब शिरोळे यांना एकत्रित करून शंकररावजी मोरे यांनी ‘शेतकरी-कामकरी’ ऐवजी नवा ‘शेतकरी-कामगार पक्ष’ स्थापन करण्याचा मुहूर्त नारळ फोडला. परिणामे 3 ऑगस्ट 1947 रोजी आळंदी मुक्कामी शंकररावजी मोरे यांनी निवडक कार्यकर्त्यांना बोलावून ऐतिहासिक बैठक घेतली. याच बैठकित आजचा ‘शेतकरी कामगार पक्ष’ महाराष्ट्रात जन्मास आला.