Sunday, May 22, 2011

शेकापला ऐतिहासिक संधी

डाव्यांचा गड बंगाल मध्ये कोसळला म्हणून आनंदाच्या उकळ्या ज्यांना फुटल्या आहेत, त्यांना भारतीय राजकारणाचा खरा आशयच समजलेला नाही त्याचप्रमाणे ज्या साम्यवादाचा पराभव बंगाल आणि केरळ मध्ये झाला, त्यांना 'साम्यवाद' या विचारप्रणालीचा अर्थ अद्याप लागलेला नाही. साम्यवादाचा पराभव जगात कोणी केला असेल, तर तो भांडवलदारांनी नाही अथवा फासिस्तानीही  नाही! साम्यवादाचा पराभव साम्यावादानीच केला, कार्ल मार्क्स म्हणून तर म्हणाला होता, 'Thank God! I am not Marxist' कोणत्याही विचारसरणीची पोथी होते , तेंव्हा तो विचार कालबाह्य होण्याची भीती निर्माण होते. सामाकालीनातेशी नाते नसणारा कोणताही आदर्शवाद वास्तव्याच्या भूमीवर ठामपणे उभा राहू शकत नाही. तो कोसळतोच आणि तो कोसळला म्हणून इतरांना जे दोष देतात त्यांच्या अभ्युदयाची शक्यता शून्य असते. भारतातील डावी चळवळ प्रभावहीन झाली, बंगालातील लाल किल्ला 'हतबुद्ध' झाला आणि महाराष्ट्रातील गढी कोसळल्या, या सार्याचे कारण आहे ते हे! हे विश्लेषण करायला आज एक निमित्त आहे . पनवेल नगरपालिका शेकापने आणि महायुतीने जिंकली आहे. कॉंग्रेसचा पराभव करत शेकापच्या उमेदवाराने मुसंडी मारली आणि शेकापचे संदीप पाटील नगराध्यक्ष झाले.
हे यश राजकीय व्युहरचनेचे आहेच हे खरेच पण 'अशा' राजकारणात वाकबगार असणाऱ्या कॉंग्रेसचा पराभव करणे हे त्या अर्थानेही सोपे नव्हते. मुद्दा असा कि एकीकडे डावे पक्ष मान टाकत असताना शेकाप मात्र अधिक शहाणपणे झेपावतो आहे, याचे लॉजिक कसे मांडता येईल? पुरोगामी समजल्या जाणाऱ्या पक्षाचा जनाधार ओसरत असताना शेतकरी कामगार पक्षाची ताकद उत्तरोत्तर वाढत आहे, याचे कारण कसे सांगता येईल! याचा अर्थ आपला पक्ष आज राज्यभर सामर्थ्यवान आहे असा अजिबात नाही. मात्र, देशातील हा एकमेव डावा पक्ष आहे , जो अभ्यूदायाच्या दिशेने चालला आहे, ज्याला विस्ताराची ओढ आहे आणि जो तरुणीला आकृष्ट करू शकतो आहे! 
-विशेष संपादकीय दैनिक कृषीवल 
                  

No comments:

Post a Comment